वॉशिंग्टन –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर बायडेन यांच्यावर बेकायदा शस्त्रखरेदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बायडेन यांच्या विरोधकांकडून या मुद्द्याचे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे.
डेलावेअरमधील फेडरल कोर्टात खटल्याच्या देखरेखीखाली असलेल्या विशेष वकिलाने दाखल केलेल्या आरोपानुसार, हंटर बायडेन यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये शस्त्र खरेदी केली तेव्हा त्यांच्या अंमली पदार्थाच्या वापराबाबतची खोटी माहिती दिली. याच कालावधीत ते कोकेनच्या आहारी गेले होते.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतीय वंशाचे रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचे आव्हान आहे.
जो बायडेन यांच्यावर आधीच महाभियोग चौकशीची टांगती तलवार आहे. त्यातच आता त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर अशा प्रकारे गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही अमेरिकेतली पहिलीच वेळ आहे.