अलाहाबाद – ज्ञानवापी प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाने पुरातत्त्व सर्वेक्षणाला (एएसआय) उद्या गुरुवारपर्यंत स्थगिती दिली आहे. याप्रकरणी उद्या दुपारी ३.३० वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांसह एएसआय अधिकाऱ्यांना या सुनावणीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर आज सकाळी सुनावणी घेतली. ही सुनावणी दुपारी एक वाजेपर्यंत चालली. त्यानंतर पुन्हा पुन्हा साडेचार वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. एएसआयच्या अतिरिक्त संचालकांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले आहे की, ‘अधिकारी सर्वेक्षण करताना ज्ञानवापीचे कोणतेही नुकसान होणार नाही.` मात्र, एएसआयच्या आश्वासनावर विश्वास नसल्याचे मुस्लिम पक्षाने म्हटले.
दरम्यान, वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. याविरोधात मशीद समितीने सोमवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने २६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वेक्षणास स्थगिती दिली. तसेच मशीद समितीला वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टात अपील करण्यास सांगितले. मंगळवारी मशीद समितीने अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली.