कोल्हापूर – ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ६ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुलकर्णी यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
चित्रकर्मी, कलासंपन्न नाट्यकर्मी, लोककला अभ्यासक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी कुलकर्णी यांची ओळख होती. त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. माहेरची साडी, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, मर्दानी, मासूम, नवरा नको गं बाई, पिंजरा, थरथराट यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. चित्रपटच नव्हे तर त्यांची काही गाणी देखील गाजली. मराठी कलाविश्वातील त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.