मडगाव – गोव्यातील मडगाव येथील रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात मूळ झारखंडच्या एका गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली. हा प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वे पोलीस आणि सुरक्षा दलाने एनजीओच्या सहाय्याने आई व बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाळाचा रडण्याचा आवाज आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यावेळी रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी ‘चाइल्ड लाइन’ संस्थेच्या कर्मचार्यांना माहिती दिली. सुरुवातीला कुणीतरी प्रवासी बाळाला सोडून गेले, असे सर्वांना वाटले. मात्र, स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर महिला रेल्वे स्थानकावरच असल्याचे दिसून आले. त्यानंतर एनजीओच्या सहाय्याने त्या महिलेची चौकशी केली असता ‘माझी आताच प्रसुती झाली असून बाळ स्वच्छतागृहात आहे. मला अशक्तपणा आल्याने बाहेर आल्यावर चक्कर आल्याने मी बाकावर बसले’, असे तिने सांगितले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून प्रसुती झालेल्या महिलेला बाळासोबत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, कोकण रेल्वे पोलीस अधिकारी सुनील गुडलर यांनी सांगितले की, यात काहीही संशयास्पद नाही. आई आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले असून दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहे.
झारखंडच्या महिलेने गोव्यातील स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिला
