झिकापासून गर्भवतींची काळजी घ्या केंद्राच्या सर्व राज्यांना सूचना

केंद्राच्या सर्व राज्यांना सूचना
नवी दिल्ली – सध्या झिका व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून हा विषाणू गर्भवती महिलांसाठी धोकादायक असल्याने झिकाचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांची विशेष काळजी घ्या, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिल्या आहेत.
देशाच्या काही भागात झिका चे रुग्ण आढळू लागताच केंद्रीय आरोग्य खाते अलर्ट मोडवर आले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थे मध्ये झिकाच्या संशयित रुग्णांचे रक्ताचे १०६ नमुने तपासण्यासाठी आले होते. त्यातील सर्वाधिक ८६ महाराष्ट्रातील होते . तर इतर पंजाब, बिहार, बडोदा , सिल्वासा आदी ठिकाणचे होते. त्यानंतर आरोग्य खात्याने झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. झिकाबाधित गर्भवती महिलांच्या गर्भाच्या वाढीचे वेळोवेळी निरीक्षण करा . तसेच संपूर्ण परिसर एडीस डासमुक्त ठेवण्यासाठी ,आवश्यक त्या उपाययोजना करा. निवासी क्षेत्रे,कामाची ठिकाणे, शाळा ,बांधकाम साईट्स ,आणि अन्य संस्थामध्ये व्हेक्टर नियंत्रक व्यवस्था वाढवा आणि वेळोवेळी संशयितांच्या रक्त चाचण्या करा. त्याबाबतच्या अहवालावर लक्ष ठेवा आणि आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढवा अशा केंद्राने सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत.