इचलकरंजी – शहरात तीन झिकाबाधित रुग्ण आढळल्यामुळे काल राज्य शासनाच्या कीटक संहारक पथकाने इचलकरंजीला भेट दिली. यावेळी आयजीएम रुग्णालयासह बाधित रुग्णांच्या घराची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेत झालेल्या बैठकीत पथक प्रमुख डॉ. महेंद्र जगताप यांनी लवकरच केंद्रीय पथकही शहरात दाखल होणार असून हे पथक दोन दिवस थांबून झिकाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.
डॉ.महेंद्र जगताप यांनी या बैठकीत झिकाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले. त्याआधी आरोग्य महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी सादर केला. यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, साथरोग कक्षाचे डॉ. तौषी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, सहायक हिवताप अधिकारी डॉ. कांबळे उपस्थित होते.
बैठकीआधी डॉ.जगताप यांनी काल आयजीएम रुग्णालयात जाऊन झिकाबाधित रुग्णांसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र कक्षाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अग्रसेन भवन येथील बाधित रुग्णांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून माहिती घेतली.