ट्रम्प यांनी गोपनीय कागद पत्रेघरी नेली ! ७ गुन्हे दाखल

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२१ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काही गोपनीय कागदपत्रे घरी नेल्याबद्दल त्यांच्यावर आणखी ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ट्रम्प यांना १३ जून रोजी दुपारी ३ वाजता मियामी येथील फेडरल कोर्ट हाऊसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ट्रम्प हे या प्रकारचा गुन्हा दाखल झालेले अमेरिकेच्या इतिहासातले पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.

एप्रिलमध्ये त्यांच्यावर एका पॉर्न स्टारला पैसे देऊन गप्प केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ४ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांच्यावर ३४ आरोप निश्चित केले. दुसरीकडे, ट्रम्प यांनी हेरगिरीचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तथापि, फेडरल कोर्टाने अद्याप ट्रम्प यांच्यावर कोणते आरोप निश्चित केले आहेत हे सांगितलेले नाही.

जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला. त्यांनी व्हाईट हाऊसमधून फ्लोरिडा येथील मार-ए-लेगो या आलिशान घरात अनेक गोपनीय कागदपत्रे नेली होती, असा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. ही कागदपत्रे राष्ट्रीय अभिलेखागाराकडे देण्यास त्यांनी नकार दिला होता. यानंतर हे प्रकरण एफबीआयकडे गेल्यावर त्यांनी केलेल्या तपासात ट्रम्प यांच्या घरातून आणि त्यांच्या खासगी क्लबमधून ३०० हून अधिक गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी सीएनएन वृत्तवाहिनीने एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडल्याचा दावा केला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये ट्रम्प असे कबूल करतात की, निवडणूक हरल्यानंतर आपण गुप्त फाईल्स आपल्या घरी नेल्या होत्या. इराणवरील हल्ल्याची माहिती असलेली संरक्षण खात्याची फाईल आपल्याकडे ठेवली, असेही ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या वकिलांनी त्यांचा बचाव करताना म्हटले की, ते तपास यंत्रणांनी त्यांना सावज बनवले आहे. ट्रम्प यांच्यावर हेरगिरी कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय त्याच्यावर कट रचणे, खोटी विधाने करणे, न्यायात अडथळा आणणे, रेकॉर्डमध्ये छेडछाड करणे, खोटी कागदपत्रे बनवणे असे आरोप आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top