तिरुअनंतपूरम – केरळमधील पहिले ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर प्रविण नाथ यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील ताणतणावांमुळे त्यांनी जीवन संपवले, असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रवीण नाथ यांनी त्यांच्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रवीण नाथ पलक्कड येथील इलवणचेरी येथील रहिवासी होते. त्यांनी 2021 मध्ये ट्रान्सजेंडर गटात मिस्टर केरळ चॅम्पियनशिप जिंकली. 2022 मध्ये ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचले होते. त्यांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या ट्रान्सजेंडर जोडीदाराशी लग्न केले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या. दोघेही वेगळे झाले असल्याचे बोलले जात होते. प्रवीणने या सर्व अफवा फेटाळत असे काहीच नसल्याचे नमूद केले होते. मात्र, आता त्यांनी अचानक जीवन संपवल्याने त्यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आत्महत्येनंतर प्रवीण यांचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यातून ही आत्महत्या आहे की घातपात, हे स्पष्ट होणार आहे. पोलीस प्रत्येक बाजूने चौकशी करत आहेत. ते प्रवीण यांच्या जोडीदाराचाही जबाब घेऊन त्याची चौकशी करणार आहेत.
ट्रान्सजेंडर बॉडीबिल्डर प्रवीण नाथ यांची विष पिऊन आत्महत्या
