नवी दिल्ली- देशातील सर्वाधिक वापरल्या जाणार्या डिझेलची मागणी गेल्या दोन महिन्यात कमी झाली आहे. पावसाने दडी मारल्याने आणि औद्योगिक उलाढाल मंदावल्याने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात डिझेलच्या विक्रीत घट झाल्याची माहिती सरकारी कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून मिळत आहे. दुसरीकडे पेट्रोलच्या विक्रीत किंचित वाढ झाली आहे.
देशभरात इंधनांच्या दोन पंचमांश वापर हा डिझेलचा होत असतो. एकूण इंधनाचा वापर १ ते १५ सप्टेंबर दरम्यान ५.८ टक्क्यांनी घसरून २.७२ दशलक्ष टन झाला आहे. सिंचन, कापणी आणि वाहतुकीसाठी इंधन वापरल्या जाणार्या भागांत पावसाने दडी मारल्याने इंधन कमी वापरले गेले. वास्तविक पावसाळ्यात डिझेलची विक्री कमीच होते. पावसाळ्यात वाहनांचा वापरही कमी केला जातो. यंदा एप्रिल-मे महिन्यात डिझेलचा वापर ६.७ आणि ९.३ टक्क्यांनी वाढला होता. मात्र जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ात तो कमी झाला होता.