डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले

डोंबिवली :गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा रोडवर लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर फाडण्यात आले आहेत. याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर जाणुनबुजुन फाडल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ढापरे बिल्डींग समोर लावण्यात आलेले हे तीन बॅनर्स फाडण्यात आल्याचे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आले. त्यांनतर शहरप्रमुख विवेक खामकर यांनी याप्रकरणी ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा अशी मागणी शहरप्रमुख खामकरांसह अन्य पदाधिका-यांनी केली आहे.

Scroll to Top