कोलकाता – 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेस जिथे मजबूत आहे तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. पण त्याचवेळी त्यांनी (काँग्रेसने) अन्य राजकीय पक्षांनाही अशी मदत केली पाहिजे. इतर पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी काँग्रेसनेही त्या पक्षांना अन्य ठिकाणी पाठिंबा देण्याची तयारी ठेवली पाहिजे.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या संभाव्य एकीची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसला मदत करण्याची तयारी दाखवली. परंतु यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला एक अटही घातली. त्या म्हणाल्या की, आम्ही केलेल्या विश्लेषणानुसार देशभरात 200 जागांवर काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. या जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, मात्र काँग्रेसनेही इतर राजकीय पक्षांना पाठींबा दिला पाहिजे. आम्ही कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा देत असू, तर काँग्रेसनेही बंगालमध्ये आम्हाला पाठिंबा द्यावा. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिथे काँग्रेसने कमी जागा लढवाव्यात, असे त्या म्हणाल्या. कर्नाटकमध्ये भाजपला पराभूत केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी तिथल्या मतदारांचे जाहीर आभार मानले होते, पण त्या वेळी त्यांनी काँग्रेसचे नाव घेणे टाळले होते. तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्या भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्रित यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
…तरच काँग्रेसला पाठिंबा देऊ ममता बॅनर्जी यांची भूमिका
