१३ ऑक्टोबरला सुनावणी
पालघर –
पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या दोन गावांतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसंबंधी गेली १९ वर्षे न्यायालयीन लढा सुरू आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने या लढ्याची गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने १३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी निश्चित केली आहे.
देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी पालघरमधील अकरपट्टी आणि पोफरण या दोन गावांतील शेतकऱ्यांना २००४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सक्तीने हटवले. मात्र, त्यांच्या पुनर्वसनासंबंधी प्रश्न सोडवले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊन रिट याचिका दाखल केली. त्यानंतर २००५ मध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. अनेक वर्षे चाललेल्या खटल्याची आता अंतिम सुनावणी होणार असल्याने ग्रामस्थांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.