अमरावती
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट दक्षिण भारतामधील तब्बल ५७,००० मंदिरांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेणार आहे. यासाठी ट्रस्टने स्वतंत्र निधी जमा केला आहे. वाराणसी येथे आयोजित केलेल्या इंटरनॅशनल टेंपल कनेक्ट एक्सपो मध्ये तिरुपती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरांचे नूतनीकरण करण्याबाबत सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांनी रविवारी या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनाला संबोधित केले. या अधिवेशनात एकूण ४५० प्रार्थनास्थळांचे व्यवस्थापक उपस्थित होते. तसेच यात गुरुद्वारा आणि जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. आपल्या भाषणात संघ प्रमुखांनी सर्व मंदिरांच्या एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की, ‘देशातील हिंदू धार्मिक स्थळांची योग्य यादी करण्याची वेळ आली आहे. देशातील मंदिरांचे सर्वेक्षण व्हायला हवे. खेड्यातील आणि रस्त्यांवरील मंदिरे यादीत असणे आवश्यक आहे. मोठ्या प्रार्थनास्थळांऐवजी लहान मंदिरांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लहान मंदिरांच्या देखभालीसाठी मदतीची गरज आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे.’
दरम्यान, निमंत्रक गिरीश कुलकर्णी म्हणाले की, ‘भारतात सुमारे २२ ते २३ लाख मंदिरे आहेत आणि त्यांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. लहान मंदिरांचा विकास करण्यासाठी मोठ्या मंदिरांनी पुढे यावे. आजपर्यंत ९७ देशांतील ९,७८२ मंदिरे डिजिटल पद्धतीने जोडली गेली आहेत.’