तिवसा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अमरावती – माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीसाठी यशदायी ठरली असून, सर्व अठरा जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत.
जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष मिळून बनलेल्या शेतकरी परिर्वतन पॅनलला एकही जागा मिळू शकली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या सहकार पॅनलला या निवडणुकीत निर्विवाद यश मिळाले आहे. यशोमती ठाकूर यांच्या गटाची तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता होती, ती कायम राखण्यात या गटाला यश मिळाले आहे. सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होऊ शकला नव्हता, राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी परिवर्तन पॅनलला साथ दिली. विजयी उमेदवारांमध्ये स्वप्निल केने, विनायक तसरे, विवेक देशमुख आदींचा समावेश आहे.
दरम्यान दिग्रसमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे तर वडवणीमध्ये राष्ट्रवादीने यश मिळवले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top