तीन घुमटाकार ढाचा! ‘बाबरी’ वगळले 12 वी पुस्तकात अयोध्या वादाचे संदर्भही बदलले

नवी दिल्ली – एनसीईआरटी (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग)ने बारावीच्या राज्यशास्त्र व सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मोठा बदल केला आहे. या पुस्तकातून बाबरी मशीद हे नाव वगळून त्याऐवजी ‘रामजन्मभूमीच्या जागेवर असलेला तीन घुमट असलेला ढाचा’ असे म्हटले आहे. या प्रकरणातील बाबरीच्या संदर्भातील ऐतिहासिक घटनांनाही वगळण्यात आले आहे.
एनसीईआरटीच्या इयत्ताच्या बारावीच्या पुस्तकात पूर्वी अयोध्या वाद इतिहास हा चार पानांचा धडा होता. आता त्यातील अनेक उल्लेख वगळून तो दोन पानांचा करण्यात आला आहे. मात्र भाजपाची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, कारसेवकांचे आंदोलन, बाबरी मशीद पडल्यानंतर उसळलेली हिंसा, भाजपाशासित राज्यात राष्ट्रपती राजवट व अयोध्येतील हिंसाचारानंतर भाजपाने व्यक्त केलेला खेद याचा उल्लेख करण्यात आला आहे.
इयत्ता 12वीच्या जुन्या पाठ्यपुस्तकात उल्लेख होता की, बाबरी मशीद ही 16 व्या शतकात मुघल बादशहा बाबरचा सेनापती मीर बाँकी याने बांधली. हा संदर्भ बदलून आता त्यात 1528 मध्ये प्रभूश्रीराम यांच्या जन्मस्थानी तीन घुमट असलेला ढाचा उभारण्यात आला होता. या ढाच्याच्या आत आणि बाहेर हिंदू देव-देवतांच्या प्रतिमा स्पष्ट दिसत होत्या, असा उल्लेख केला आहे. फैजाबाद जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी 1986 साली मशिदीचे टाळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या वादाची माहिती पूर्वीच्या पुस्तकात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी काढण्यात आलेली रथयात्रा आणि कारसेवेमुळे निर्माण झालेला जातीय तणाव, 1992 मध्ये बाबरी मशीद पतनानंतर देशभर उसळलेल्या जातीय दंगली यांचाही उल्लेख होता. नव्या पुस्तकात हे सर्व उल्लेख काढून फक्त भाजपाने अयोध्येतील घटनांवर खेद व्यक्त केल्याचा
उल्लेख आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top