तुकोबांची पालखी ओढण्याचा गुलाब आणि मल्हारला मान

पुणे

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान २९ जून रोजी होणार आहे. संत तुकाराम महाराजांचा यावर्षी ३३९ वा पालखी सोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याचा व सेवा करण्याचा मान पुण्यातील नांदेड गावातील गुलाब आणि मल्हार या बैलजोडीला मिळाला आहे. नांदेड येथील निखिल कोरडे यांच्या मालकीची ही बैलजोडी आहे. तुकोबांची पालखी ओढण्याचे भाग्य बैलांना मिळाल्याने कोरडे कुटुंबीयांनी आनंदी भावना व्यक्त केली.

निखिल कोरडे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. निखिल कोरडे यांच्याकडे १० बैल असून त्यापैकी गुलाब आणि मल्हार आहेत. देहू संस्थांनकडे यावर्षी २६ अर्ज प्राप्त झाले होते. यावर्षी तुकाराम महाराजांचा ३३९ वा पालखी सोहळा आहे. पालखीच्या रथाला जोडण्यासाठी दिमाखदार,ऐटबाज व देखण्या बैलजोडीची निवड करण्याचे आव्हान संस्थानापुढे होते. संस्थान समिती अर्जदारांकडे जाऊन बैलांचा रंग, शिंगे, खुर, क्षमता, ताकद, वशिंड,शेपटी, उंची, बैलाची चाल या सर्वांचे परीक्षण करून बैल जोडीची निवड करते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top