मुंबई
अतिशय वेगवान, अत्याधुनिक सुविधा, पूर्णतः वातानुकूलित एक्स्प्रेस अशी ख्याती असलेल्या तेजस एक्स्प्रेसच्या सेवेबद्दल प्रवासी नाराज आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेवर धावणाऱ्या मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेसचे स्वयंचलित दरवाजे अर्धवट बंद होत असून मनोरंजन स्क्रीन, वायफाय आणि यूएसबी साॅकेट इत्यादी सुविधा बंदच आहेत. याशिवाय या एक्स्प्रेसमधील जेवणाचा दर्जाही घसरल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.
मुंबई – गोव्यादरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रवासी सीएसएमटी ते मडगाव तेजस एक्स्प्रेसला पसंती देतात. जलद प्रवासासोबत अत्याधुनिक सुविधांचा लाभ होईल या अपेक्षेने प्रवासी अधिक पैसे मोजतात. मात्र, प्रवास जलद होत असला, तरी या ट्रेनमधील सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये नाराजी उमटू लागली आहे. याच मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस धावत असून या एक्स्प्रेसच्या तिकिटाचे दर तेजसच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे प्रवासी तेजस एक्स्प्रेसबद्दल खंत व्यक्त करू लागले आहेत. तेजस एक्स्प्रेसमधील जेवण निकृष्ट दर्जाचे असते. पनीर मसाल्यात पाणी मिसळले जाते. तीन बटाट्याच्या फोडींची भाजी आणि जाडजाड पोळ्या दिल्या जातात, अशी तक्रार प्रवासी करीत आहेत.