तेलंगणमध्ये शेतकऱ्यांसाठी
२२८ कोटी रुपयांचे पॅकेज

करीमनगर : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गारपिटीमुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी २२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्या अंतर्गत गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा प्रकार कोणताही असला, प्रति एकर १० हजार रुपये मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. खम्माम, महाबुबाबाद, वारंगल, करीमनगर आदी ठिकाणी गारपिटीमुळे फटका बसलेल्या भागांचा आढावा केल्यानंतर राव यांनी मदतीची घोषणा केली.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, ‘‘राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे दोन लाख २२ हजार २५० एकरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. मका, आंबा, भात आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकार मदतीला येणार नसले, तरी राज्य सरकार लगेच पुनर्वसन करेल.’’ गारपिटीमुळे राज्यात २ लाख २२ हजार २५० एकर क्षेत्रावरील सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मका १,२९,४४६ एकर, भात ७२, ७०९ एकर, आंबा ८,८६५ एकर आणि १७,२३८ एकर क्षेत्रावरील इतर पिकांचे नुकसान झाले, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येणार नाही, याची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य तातडीने पुनर्वसन मदत देत असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी नंतर महबूबाबाद जिल्ह्याचा दौरा केला. रेड्डीकुंता थांडा गावात पालकुर्ती विभागातील गारपिटीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यांच्यासोबत कृषी मंत्री निरंजन रेड्डी, मंत्री एराबेली दयाकर राव, सत्यवती राठोड रिथु बंधू, समितीचे अध्यक्ष पल्ला राजेश्वर रेड्डी आणि या विभागाचे आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य होते. नंतर त्यांनी वारंगल जिल्ह्यातील नरसंपेत विभाग चोप्पादांडी विभागातील रामदुगु मंडळाच्या लक्ष्मीपूर गावातील नुकसानीची पाहणी केली.

Scroll to Top