मुंबई – तेलंगणामध्ये एका नवीन हिंदू मंदिराची उभारणी होत आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर थ्रीडी प्रिंटद्वारे तयार करण्यात येणार आहे. या प्रकारचे हे जगातील पहिलेच मंदिर आहे. अप्सुजा इन्फ्राटेकने यासाठी सिम्पली फोर्ज क्रिएशन्स या थ्रीडी प्रिंटिंग बांधकाम कंपनीशी करार केला आहे.
सिद्धीपेटमधील बुरुगपल्ली येथे असणाऱ्या चारविथा मेडोसमध्ये हे ३,८०० स्क्वेअर फूट परिसरात हे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराचे तीन भाग असणार आहेत. अप्सुजा इन्फ्राटेकचे एमडी हरी कृष्णा जीदीपल्ली यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, या मंदिराला तीन गर्भगृहे असणार आहेत. त्यांचा आकार वेगवेगळा असेल. पहिले गर्भगृह हे भगवान शंकराचे असेल. हे गर्भगृह चौकोनी आकाराचे असेल. त्यानंतर मोदकाच्या आकाराचे गर्भगृह भगवान गणपतीसाठी असेल. तर कमळाच्या आकाराच्या गर्भगृहात देवी पार्वतीची स्थापना केली जाईल.
थ्री-डी प्रिंटेड पूल मार्चमध्ये सिम्पली फोर्ज क्रिएशन आणि आयआयटी हैदराबाद यांनी एकत्र मिळून एक थ्री-डी प्रिंटेड पूल तयार केला होता. हा भारतातील पहिला प्रोटोटाईप थ्रीडी प्रिंटेड पूल होता. या पुलाची चाचणी केल्यानंतर आता मंदिराबाहेरील गार्डनमध्ये पादचारी पूल म्हणून याचा वापर करण्यात येत आहे.
सिम्पली फोर्ज क्रिएशनचे सीईओ ध्रुव गांधी मंदिराबाबत माहिती देताना म्हणाले, गर्भगृहांपैकी शिवालय आणि मोदकाच्या आकाराचे गर्भगृह यांचं प्रिंटिंग पूर्ण झाले आहे. सध्या कमळाच्या आकाराचे गर्भगृह आणि गोपुरम यांचे प्रिंटिंगचे काम सुरू आहे. मोदकाच्या आकाराचे गर्भगृह बनवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, दहा दिवसांच्या कालावधीत अवघ्या सहा तासांत ते तयार झाले. आता कमळाच्या आकाराचे गर्भगृह हे याहून कमी वेळेत पूर्ण होईल अशी आशा आहे. असे आकार साकारणे हे खूप अवघड असते. मात्र, थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा प्रकारचे विविध आकार बनवणे अगदी सोपे जात आहे.
तेलंगणामध्ये साकारणार जगातील पहिले थ्रीडी प्रिंटेड हिंदू मंदिर
