नाशिक – नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदू संघटनांतर्फे आज गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. तसेच मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणार्यांना 72 तासांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दोन दिवस बंद ठेवू, असा इशाराही त्यांनी पोलीस व मंदिर प्रशासनाला दिला.
सोमवारी रात्री एका जमावाने मंदिरात त्र्यंबकेश्वर घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. बुधवारी हिंदू महासभाने भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या हस्ते मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हिंदू महासभेचे कार्यकर्ते मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर जमा झाले. त्यानंतर त्यांनी गोमूत्र शिंपडून प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
हिंदू महासभाचे आनंद दवे यांनी सांगितले की, काही जणांनी मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नाशिकची जनता पुरेशी आहे. मात्र, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज राज्यभरातून कार्यकर्ते येथे आले होते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. सर्वजण येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, इतर धर्मियांनी चादर चढवण्याची कोणतीही परंपरा येथे नाही.
भाजपच्या तुषार भोसलेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनाही फटकारले. राऊत यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना सकाळी म्हटले होते की, ’महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर श्रद्धास्थान आहे. त्यामुळे घटनेची माहिती घेतली असता तिथे कुणी घुसण्याचा प्रयत्न केला नाही. मुस्लिम लोक संदलच्या दरम्यान तिथे पायरीवर धूप दाखवतात, आरती करतात. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून ती पूर्वापार चालत आलेली आहे. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे, पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत.’
या वक्तव्याबद्दल राऊत यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी, असा इशारा भोसले यांनी दिला. तर राज्यातील दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का याची चौकशी करा, असे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदू संघटनांकडून गोमूत्राने शुद्धीकरण
