नाशिक – त्र्यंबकेश्वर शहरातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी घुसून चादर पांघरण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत गेले दोन दिवस मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र यात काही तथ्य नाही. हिंदुत्वावर स्वार झालेल्या काहींनी मुद्दाम नेहमीच्या उत्सवाला हिरवा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीम बांधवांना रोज पोलीस स्टेशनला बोलवून त्यांची चौकशी केली जात आहे. यामागे कोणते राजकारण आहे याचा उलगडा लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ दर्गा आहे. दरवर्षी या दर्ग्यात दरवर्षीप्रमाणे उरूस भरला होता. दर्ग्याला चादर चढवल्यानंतर ती चादर घेऊन शहरात संदल मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मंदिरावरूनच जाते. मंदिराच्या उत्तर दरवाजापाशी मिरवणूक पोहोचली की उरुसातील सेवेकरी दरवाजाच्या पायरीजवळ जाऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. पेशवे काळापासूनची ही परंपरा आहे. यंदाही हेच घडले. मात्र चादर घेऊन आलेल्या सेवेकर्यांपैकी काही जणांनी मंदिरात प्रवेश करून त्र्यंबकेश्वराला चादर चढवण्याचा प्रयत्न केला, अशी आवई उठवण्यात आली आणि तेव्हापासून त्र्यंबकेश्वरात तणाव निर्माण झाला आहे. आज उरूस आयोजकांनी हा आरोप फेटाळून लावत म्हटले की, आम्ही दरवर्षी अशाच प्रकारे मिरवणूक काढतो आणि धूप दाखवतो. मागल्या वर्षीही आम्ही हेच केले. मंदिरात जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. मंदिरात चादर कधीही चढवली जात नाही. ही बाबांची चादर आहे. ती पुन्हा परत नेली जाते. दरवर्षी असेच घडते. मात्र यावर्षी वाद का निर्माण करण्यात आला आहे? मंदिर प्रशासनाने आमच्या विरोधात तक्रार का केली आहे हे आम्हाला समजेनासे झाले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ही वार्ता पसरल्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यातच कथित घटनेच्या दुसर्या दिवशी मंदिर प्रशासन आणि ब्राह्मण संघाने घटनेची चौकशी करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. तेव्हापासून मुस्लीम बांधवांना रोज पोलीस स्टेशनला बोलवून त्रास दिला जात आहे. कोणाच्या दबावाखाली हे धर्माचे राजकारण सुरू झाले आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची घोषणा केली. या प्रकाराची सखोल चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिले. खरा प्रकार काय घडला हे लवकरात लवकर उघड होऊन सामाजिक सलोखा प्रस्थापित व्हावा हीच अपेक्षा आहे. त्र्यंबकेश्वरमधील नागरिक मात्र नाराज आहेत. नेहमीच्या परंपरेला चुकीचा रंग फासविण्याचा प्रयत्न करून काहींनी उगाचच तणाव निर्माण केला, असे त्यांचे म्हणणे आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेला ‘हिरवा’ रंग? एसआयटी स्थापन करण्याची घोषणा
