पणजी- दक्षिण गोव्यातील किनारी भागात पर्यटन व्यवसायाला मोपा विमानतळामुळे फटका बसला आहे. दाबोळी विमानतळावर दाखल होणारी अनेक विमाने ‘मोपा’कडे वळविण्यात येत असल्याने आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, अशी व्यथा अखिल गोवा शॅक्समालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ फर्नांडिस तसेच इतर व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
देशी-विदेशी पर्यटक नसल्यामुळे भर हंगामात येथे उभारलेले शॅक्स बंद करण्याची वेळ शॅक्स मालकांवर आली आहे.मोपा विमानतळ होण्यापूर्वी दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवर असंख्य पर्यटक दाखल होत होते.दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटक थेट दक्षिण गोव्यात दाखल व्हायचे. आता ‘दाबोळी’वर येणारी अनेक विमाने मोपा विमानतळावर उतरवली जात आहेत. काही विमान कंपन्या पर्यटकांना मोपा विमानतळावर उतरण्याची सक्ती करतात. त्यामुळे यंदाच्या हंगामात शॅक व्यावसाय बुडत चालला आहे. शॅक काढण्याची वेळ आली, अशी माहिती मोबोर येथील शॅक व्यावसायिक क्रूझ यांनी दिली.