अनंतनाग : कश्मीरच्या बारामुल्लामधील एलओसीजवळ उरी, हथलंगा येथून सीमेलगतच्या भागातून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणार्या तीन दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. यातील दोन दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले, परंतु एका दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेताना पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरू करण्यात आला होता.
जम्मूच्या उरी भागात गेले ७२ तासहून अधिक काळ सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिस यांच्याकडून संयुक्त मोहीम सुरू आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. शनिवारी सकाळी बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय लष्कराने त्यांना ठार केले. या चकमकीत मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मात्र, सीमेजवळील पाकिस्तानी लष्काराकडून सतत गोळीबार चालू असल्यामुळे तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेताना अडचणी येत असून मृत दहशतवादी आणि त्यांच्या संघटनेची ओळख अद्याप समजू शकलेली नाही.
बुधवारी राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि काश्मीर पोलीस डीएसपी हुमायून मुजम्मील भट्ट हे चकमकीत शहीद झाले होते. तेव्हापासून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
दहशतवाद्याचा मृतदेह घेताना पाकिस्तानकडून गोळीबार
