पुणे – सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील हॉटेलमध्ये तोडफोड आणि लूटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. वैभव इक्कर(२३) असे त्याचे नाव आहे. ‘आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही,’ असे म्हणत किरकटवाडी शीव रस्ता परिसरात हा गुन्हेगार दहशत माजवत होता. त्यामुळे याच रस्त्यावर पोलिसांनी त्याला चोप देत त्याची धिंड काढली.
वैभव इक्कर हा खडकवासलामधील कोल्हेवाडी येथील रहिवासी आहे. त्याने रविवारी किरकिटवाडी परिसरात साथीदारांच्या मदतीने हॉटेलची तोडफोड करत लुटमार केली. यावेळी त्याने पोलिस कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. त्यानंतर नुकसानग्रस्त हॉटेल मालकाने हवेली पोलिसात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी वैभव व त्याचा साथीदार चेतन चोरघे याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी वैभव आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आणि घटनास्थळी आणून त्याची चांगलीच धुलाई केली. तसेच त्या रस्त्यावरून त्याची धिंड काढली. गेल्या काही दिवसांपासून तो सामान्य नागरिकांना त्रास देत होता. मात्र पोलिसांनी त्याच्या दादागिरीला चाप लावला.