मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक-१चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी या फलाटाला जोडून असलेला फलाट क्रमांक २ शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून बंद केला जाणार. याचाच अर्थ दादरहून सुटणारी धीमी लोकलसेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे धीमी दादर लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना आता परळ स्थानक गाठावे लागणार आहे.
मुंबईच्या लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या प्रमाणात स्थानकांतील प्रवासी सुविधा नाहीत. यामुळे दादरच्या फलाट क्रमांक १ आणि २वर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. अरुंद फलाटावर प्रवाशांची रेटारेटी आवरताना रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होते. यामुळे फलाटाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ची लांबी २७० मीटर असून रुंदी ७ मीटर आहे. आता फलाटाची रुंदी साडेतीन मीटरने वाढवून १०.५ मीटर केली जाणार आहे. रुंदीकरणाचे काम शुक्रवार, दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. फलाट १-२वर दोन पादचारी पूल आहेत.रुंदीकरणाच्या कामासाठी फलाट क्रमांक १ व२ वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एकूण २२ लोकल फेऱ्या परळ टर्मिनसहून सुटणार आहेत. पुढील सूचनेपर्यंत दादर स्थानकातील अप-डाउन धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालविण्यात येणार आहेत. यामुळे दादर लोकल बंद होऊन आता परळ लोकल सुरू होणार आहेत. दादर जलद लोकल मात्र वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध राहणार आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.