वॉशिंग्टन – अमेरिकेत अजूनही कृष्णवर्णीयांवर होणारा हिंसाचार थांबत नाही. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत गोळीबाराच्या घटना खूप वाढल्या असताना आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील मिसूरी येथे एका ८५ वर्षीय व्यक्तीने एका कृष्णवर्णीय मुलावर गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला आहे. त्या मुलाने चुकून या वृद्धाच्या घराची बेल वाजवली होती. यावर संतप्त त्याने या मुलावर गोळ्या झाडल्या. सध्या या मुलावर उपचार सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेचा निषेध केला असून, या मुलाला बरा झाल्यानंतर आपल्या निवासस्थानी बोलवले आहे. या प्रकरणातील संशयित वृद्ध अमेरिकन व्यक्तीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
१६ वर्षीय राल्फ पॉल यार्ल, असे जखमी झालेल्या किशोरवयीन मुलाचे नाव आहे. गुरुवारी रात्री आपल्या भावांना घेण्यासाठी गेलेल्या राल्फने चुकून ८५ वर्षीय अँड्र्यू लेस्टरवरच्या घराची बेल वाजवली होती. संतप्त झालेल्या अँड्र्यूने राल्फवर बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पॉल याच्या डोक्याला लागली आहे. त्याला रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अँड्र्यू यांच्यावर हिंसा आणि शस्त्राचा गुन्हेगारी वापर केल्याचा आरोप लावला आहे. बायडेन यांनी या घटनेची निंदा केली आहे. तसेच युनायटेड स्टेट्स व्यापक गन व्हॉयलन्सचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.