कोटा
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील बपावर क्षेत्र परिसरात दिगंबर जैन संत अरहंत सागर यांचा अपघाती मृत्यू झाला. चांदखेडी येथून ते दतियासाठी जात असताना झालावाड बारा मेगा हायवेवर त्यांच्या कारचे टायर फुटल्याने अपघात झाला. या घटनेत गाडी चालक भुरालाल आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.
बपावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम मीण यांनी सांगितले की, बारा-झालावाड मेगा हायवेवर दुपारी जवळपास ३.३० वाजता जोरदार धमाका झाल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, एक चारचाकी गाडी पलटी झाली असून शेतात पडल्याचे दिसून आले. या कारमधून दिंगबर जैन संत अरहंत सागर महाराज हे प्रवास करत होते. तर, गाडी चालक भुरालाल (२७) आणि महिला उषा जैन (६०) हे जखमी झाले असून दोघांना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस प्रशासनाला लेखीस्वरुपात निवेदन दिल्यानंतर अरहंत सागर यांचा मृतदेह शवविच्छेदनाशिवाय ताब्यात घेण्यात आला. व तिथून मृतदेह सोनगीर येथील निवासी मंदिराकडे नेण्यात आला.