नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पंजाब अबकारी आणि कर विभागाच्या १० अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावले आहे. याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजीव कुमार यांनी या १० अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे.
समन्समध्ये पंजाबच्या १० अधिकाऱ्यांना ११ आणि १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. आयपीसीच्या कलम १६० अंतर्गत जारी केलेले समन्स उत्पादन शुल्क आणि कर विभागाच्या मुख्य कार्यालयामार्फत पाठवण्यात आले होते. दिल्ली अबकारी घोटाळ्यात ईडीने यापूर्वीच तीन अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. ज्यामध्ये फायनान्शिअल कमिशनर एक्साइज अँड टॅक्सेशन के. एपी सिन्हा यांच्या नावाचाही समावेश आहे.
भटिंडातील अकाली दलाच्या खासदार आणि बादल कुटुंबाच्या सून हरसिमरत कौर बादल यांनी ३ ऑगस्ट रोजी संसदेत पंजाबच्या उत्पादन शुल्क धोरणावर प्रश्न उपस्थित केला होता. दिल्लीत चौकशी होत असलेल्या धोरणाप्रमाणेच त्यांनी सभागृहात या धोरणाचे वर्णन केले होते. खासदार हरसिमरत यांनी सभागृहात सांगितले होते की, काही कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी आणि आम आदमी पक्षाला पैसे परत पाठवण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे. संसदेत चर्चेदरम्यान हरसिमरत बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पंजाबमधील कथित दारू घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. गृहमंत्र्यांच्या विनंतीनंतर त्यांनी यासंदर्भात निवेदनही दिले.