दिल्लीनंतर हरयाणात यमुनेच्या पुराचे थैमान! घग्गर धरण फुटले

चंदीगड – मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर आल्याने दिल्ली जलमय झाली असतानाच आता यमुना नदीच्या पुराचा हरयाणाला जोरदार फटका बसला आहे. राज्यातील सिरसा आणि फतेहाबाद शहराजवळील घग्गर धरण फुटले. त्यामुळे राज्यातील अंबाला, पंचकुला, कुरुक्षेत्र, कर्नाल, यमुनानगर, पानिपत आणि कैथल जिल्ह्यातील रस्ते जलमय झाले आहेत.
हरयाणातील १४ गावांत पाणी शिरले आहे. एका ठिकाणी शाळेची इमारत कोसळली आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यातील दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा आणि डीएलईडी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हरयाणा राज्य सरकारने घेतला आहे. दहावी-बारावी कंपार्टमेंट परीक्षा आणि डीएलईडीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा आता २१ जुलैपासून सुरू होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. फतेहाबादमधील ३ गावांत प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. कर्नालमधील ३४, पानिपतमधील २४, सोनिपतमधील २२ आणि यमुनानगरमधील २० गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी गावातून स्थलांतर करत आहेत. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके अनेक जिह्यांत मदतकार्य करीत आहेत.
दोन राज्यांत ३९ पूरबळी
पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांत आतापर्यंत पुरामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये १९, तर हरयाणामधील २० जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील २२ हजारांहून अधिक नागरिकांना, तर हरयाणातील ४ हजार ४९५ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top