मुंबई
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) शुक्रवारी मेट्रो मार्ग-३ चे कुलाबा-वांद्रे-सीप्झच्या संचलन आणि देखभालीचे कंत्राट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (डीएमआरसी) दिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर हे कंत्राट त्यांना देण्यात आले. संचलन नियंत्रण केंद्रे, डेपो नियंत्रण केंद्र, स्थानके यांचे व्यवस्थापन व सर्व गाड्या व मेट्रो प्रणालीच्या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी डीएमआरसीची असणार आहे.
भारतातील मेट्रो रेल्वे क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या डीएमआरसीने २० वर्षांहून अधिक काळ दिल्ली मेट्रो अंतर्गत विविध मेट्रो मार्गांचे यशस्वी संचलन व देखभाल केले आहे. मुंबईतील पहिल्या पूर्णतः भूमिगत असलेल्या मेट्रो-३ मार्गाच्या कार्यान्वयनासाठी संचलन आणि देखभालीसाठी हा करार महत्त्वाचा आहे. या कराराचा कालावधी दहा वर्ष असून, याअंतर्गत डीएमआरसी मेट्रो- ३च्या दैनंदिन संचलन व देखभालीसाठी जबाबदार असणार आहे. याशिवाय संचलन नियंत्रण केंद्र, डेपो नियंत्रण केंद्र व स्थानके यांचे व्यवस्थापन तसेच सर्व मेट्रो प्रणालीच्या पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे याचीही जबाबदारी डीएमआरसीकडे असणार आहे. मुंबईकरांना स्वच्छ, कार्यक्षम आणि आरामदायी सेवा सुनिश्चित करण्यासाठी ते मुख्य कार्यप्रदर्शन निर्देशकाद्वारे नियंत्रित करतील.