दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर
१५ मार्चपासून अधिक वेगवान

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील मुंबईतून रत्नागिरीपर्यंत जाणारी दिवा ते रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे १५ मार्चपासून अधिक वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेने या गाडीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. दिवा ते रत्नागिरी या प्रवासासाठी तब्बल नऊ तास १५ मिनिटे लागत होती. आता सुधारित वेळापत्रकामुळे ही गाडी सहा तास ४५ मिनिटात रत्नागिरीत पोहोचणार आहे. यामुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजर प्रवास वेळेस तब्बल अडीच तासांची बचत करून फास्ट पॅसेंजरप्रमाणे धावणार आहे.

कोकण रेल्वेकडून बदलण्यात आलेल्या वेळापत्रकानूसार दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला ती रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. पूर्वी ती गाडी रात्री २ वाजता पोहचत होती. रत्नागिरी येथून सकाळी सुटलेली गाडी दिव्याला दुपारी १.२५ वाजता पोहोचते. ती परतीच्या फेरीत सायंकाळी ५.५० ला सुटणार आहे. यामध्ये ४ तास २५ मिनिटे गाडी दिवा येथे थांबूनच राहते. ही पॅसेंजर रेल्वे दादर येथून चालवण्याचा निर्णय अद्याप कोकण रेल्वेने घेतलेला नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणातील नागरिकांच्या मागणीनुसार ही गाडी दादरपर्यंत नेण्याची सूचना मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

Scroll to Top