रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मार्गावर दुचाकीच्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांनी आपला जीव गमावला. यश भगवान पालांडे (१८) आणि भावेश भगवान पालांडे (२१) अशी या दोघांची नावे आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री उमरोली गायकरवाडी जवळ झाला. यात दुचाकीचे दोन तुकडे झाले.
भावेश आणि यश भरधाव वेगात दुचाकीने मार्गताम्हनेहून चिपळूणच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी बाजूच्या कठड्यावर जोरदार आदळली. हा अपघात एका अवघड वळणावर झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. यातील एकाचा जागी मृत्यू झाला. तर दुसऱ्याला उपचारासाठी लाईफकेअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जास्त मार बसल्याने त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, हे दोघे भाऊ मार्गताम्हने येथे आपल्या मामाकडे जात होते. हे दोन भाऊ आपल्या आई-वडिलांसह येथे राहत होते. येथील नातू महाविद्यालयात ते शिक्षण घेत होते.