कांचीपुरम- सोशल मीडियावरील प्रसिद्ध मोटोव्हलॉगर आणि यूट्यूबर टीटीएफ वासन याचा मोटारसायकलवर ‘व्हीली’ स्टंट करताना अपघात झाला. यात हा यू ट्युबर जखमी झाला. तामिळनाडूतील कांचीपुरम येथील चेन्नई-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला.
दुचाकीवर ‘व्हीली’ नावाचा स्टंट करत असताना अचानक वासनचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी उलटली. त्यानंतर तो आधी खाली फेकला गेला. त्याची दुचाकी त्याच्यापासून १०० मीटर अंतरावर पुढे पडली. या घटनेत वासन गंभीर जखमी झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘व्हील’ स्टंटमध्ये दुचाकीचे पुढचे चाक उंचावले जाते आणि दुचाकी केवळ मागील चाकावर चालते. हा स्टंट धोकादायक असतो. जखमी वासनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले .
वासन एक प्रसिद्ध मोटोव्हलॉगर आणि यूट्यूबर असून त्याचे ‘ट्विन थ्रोटल्स’ नावाचे यूटयूब चॅनल आहे. त्याचे ४० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल आतापर्यंत अनेकदा दंडही भरला आहे.