कोची- केरळ राज्याचा ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेला कोची वॉटर मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकार्पण केले. त्याआधी सकाळी तिरुअनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्टेशनवर त्यांनी केरळमधील पहिल्या वंदे भारत तिरुअनंतपुरम-कासारगोड एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
कोची वॉटर मेट्रोचे लोकार्पण केल्यानंतर लोकांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, ‘वॉटर मेट्रोमुळे कोचीसह आसपासच्या अनेक बेटांवर राहणाऱ्या लोकांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक उपलब्ध होईल. त्यामुळे कोचीची वाहतूक समस्याही कमी होण्यास मदत होईल. बॅक वॉटर टुरिझमलाही नवे आकर्षण मिळणार आहे. केरळमध्ये होत असलेला हा प्रयोग देशातील इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन म्हणाले की, ‘वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे बेटवासीयांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. वाहतूक व्यवस्था अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरत असल्याने ती टिकाऊ आहे. बोटीची रचना एका अनोख्या पद्धतीने केली गेली आहे. कोची वॉटर मेट्रोमुळे दरवर्षी 44 हजार टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात 34 हजार प्रवासी वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.