लॉस एंजेलिस
अमेरिकन अभिनेता डॅनियल मास्टरसन(४७) याला लॉस एंजेलिसच्या एका न्यायालयाने बुधवारी ३ पैकी २ बलात्काराच्या प्रकरणात दोषी म्हणून जाहीर केले. डॅनियलला दोषी म्हणून जाहीर केल्यानंतर त्याला बेड्या ठोकून न्यायालयातून तुरुंगात नेण्यात आले. या प्रकरणात त्याला ३० वर्ष कारावासाची शिक्षा होईल, अशी शक्यता वर्तवली जाते.
या प्रकरणाचा सात महिला आणि पाच पुरुषांच्या ज्युरीने दोन आठवडे पूर्ण विचार केला व त्यानंतरच हा निर्णय जाहीर केला. डॅनियलवर त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेमिकेने लावलेल्या आरोपावर अद्याप ज्युरींनी आपला निर्णय दिलेला नाही. यासंदर्भात डॅनियलच्या प्रवक्त्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने यावर भाष्य करणे टाळले. डॅनियलचे वकील न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात अपील करतील असे सांगण्यात येते. डॅनियलची शिक्षा जाहिर होईपर्यंत त्याला जामीन मिळणार नाही, अद्याप शिक्षेच्या सुनावणीची तारीख जाहीर केलेली नाही. पण न्यायाधीशांनी डॅनियल आणि त्याच्या वकीलांना सुनावणीसाठी ४ ऑगस्ट रोजी न्यायलायत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीवेळी त्याची पत्नी अभिनेत्री बिजोऊ फिलिप्स देखील हजर होती. न्यायलायचा निर्णय ऐकून डॅनियलचे कुटुंब आणि मित्रपरिवार स्तब्ध झाला.