- सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : देशातल्या एटीएम मशीन्समध्ये दोन हजारच्या नोटा न भरण्याच्या कोणत्याही सूचना सरकारने बँकांना दिलेल्या नाहीत असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी २० मार्च रोजी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिले. ग्राहकांच्या गरजांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून बँकाच हा निर्णय घेत असतात असे त्यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०१७ च्या शेवटी आणि २०२२च्या मार्च अखेरीस ५०० आणि २,००० रुपयांच्या अनुक्रमे ९.५१२ लाख कोटी आणि २७.०५७ लाख कोटींच्या नोटा चलनात आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. एटीएममध्ये रु. २००० च्या नोटा भरू नयेत यासाठी बँकांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. बँका एटीएमसाठी भूतकाळातील वापर, ग्राहकांची गरज, हंगामी कल इत्यादींच्या आधारावर रक्कम आणि मूल्यांची आवश्यकता यांचे स्वतःचे मूल्यांकन करतात, असेही सीतारामन म्हणाल्या