नगरपरिषदेच्या १६ शाळा
सेमी इंग्रजी होण्याची शक्यता

अंबरनाथ – अंबरनाथ येथील नगरपरिषदेच्या १६ शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजी शिक्षण सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या शाळांमध्ये १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीत शिक्षण देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली होती. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भातील पुढील कार्यवाहीच्या सूचना शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आल्या.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अंबरनाथ नगरपरिषदेच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी द्यावी, अशी लेखी मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री केसरकर यांच्याकडे केली. सेमी इंग्रजी शिक्षणामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणामध्ये तग धरण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. अंबरनाथ नगरपरिषदेच्या एकूण ९८ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या १,५४५ एवढी आहे. सद्यस्थितीत अंबरनाथ शहरात शासकीय शाळांमध्ये इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे येथील शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Scroll to Top