मुंबई – एल्गार परिषद-माओवादी संबंध या आरोपाखाली नवी मुंबई येथील निवासस्थानी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए’च्या विशेष न्यायालयाने नाकारला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’शी संबंध असल्याची शक्यता विशेष न्यायालयाने व्यक्त केली आहे.
गौतम नवलखा यांचे ‘आयएसआय’चा एजंट सय्यद गुलाम नबी फई यांच्याशी संबंध असल्याचे विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने म्हटले आहे. अमेरिकेतील टेरर फायनान्सिंग प्रकरणात फईला दोषी ठरवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात विशेष न्यायाधीशांनी आदेश दिला असतानाही नवलखा यांना जामीन मंजूर केला होता. परंतु विशेष न्यायालयाने नवलखा यांचे ‘आयएसआय’ एजंटशी संबंध असल्याचे दिसत असल्याचे आपल्या आदेशात स्पष्ट करताना नवलखा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
नवलखा यांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना सुरुवातीला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एप्रिल २०२० मध्ये त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. मात्र, गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची एक महिन्याच्या नजरकैदेची याचिका मान्य केली.