नवाब मलिकांच्या जामीनाची
सुनावणी आणखी लांबणीवर

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले. मात्र, त्यांना अजुनही जामीन मिळालेला नाही. अशातच न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची बदली झाल्याने मालिकांच्या जामीनाची सुनावणी आणखी लांबणीवर जाणार आहे.

मलिक यांची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर सुरू होती. परंतु, त्यांची आता गोवा खंडपीठात बदली झाल्याने मलिक यांना न्यायासाठी पुन्हा नव्या कोर्टाकडे जावे लागणार आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयात मलिकांना आता नव्या खंडपीठासमोर दाद मागावी लागणार आहे.

दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मालिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर मालिकांनी वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याच्या मागणीसाठी याचिका सादर केली. त्यांची याचिका गुणवत्तेच्या आधारे ऐकली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र, आर्थिक गैरव्यवहार कायद्यातील आजारी व्यक्तीच्या संकल्पनेत मलिक मोडतात का, अशी विचारणा करून त्यांची प्रकृती खरोखर चिंताजनक आहे हे पटवून देण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी मालिकांच्या वकिलांना दिले.

Scroll to Top