नवा जालनावाला घडवला उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

जळगाव – जळगावात आज दुपारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती सभा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या जालन्यातील मनोज जरांगेच्या आंदोलनाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, जरांगे-पाटलांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. पोलिसांनी जालनात मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. यापूर्वी जालियनवाला येथे अमानुष अत्याचार येथे झाला होता. आता यांनी नवा जालनावाला घडवला. जळगावात छत्रपती शिवाजी महाराज आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचे लोर्कापण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर घेतलेल्या वचनपूर्ती सभेत भाजपवर कठोर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिरासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने लोकांना बोलवणार आहेत. परतताना या लोकांवर हल्ला शकतो, गोध्रासारख्या घटना होऊ शकतात, लोकांची घरे पेटू शकतात. या पेटत्या घरांच्या होळीवर ते राजकीय पोळ्या भाजतील. काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा हिंदू खतरे में है अशा घोषणा देत होते. आता मोदी सरकारला नऊ वर्षे झाली आहेत, तरी मोदी सरकारला कश्मीरमधील हिंदू पंडितांना परत आणता आले नाही, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, आपले बेकायदा मुख्यमंत्रीसुद्धा जी-२० परिषदेला गेले आहेत. तिथे त्यांची ऋषी सुनक आणि जो बायडन यांच्याशी भेट झाली. भेटीत त्यांच्याशी काय बोलणे झाले. ते मुख्यमंत्र्यांना कळले का, तुम्ही बोलले ते त्यांना कळले का? मुख्यमंत्री फक्त फोटो काढून आले. नुसती चमकोगिरी केली. आजपर्यंत तुम्ही आमची दोस्ती अजमावलीत, आता तुम्ही आमच्या मशालीची धग अनुभवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top