नवी मुंबई – गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी १३९ कृत्रिम तलावांची निर्मीती करण्यात आली असून २२ पारंपरिक तलावांमध्येही विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना १८ ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात विशेष कक्ष स्थापित करण्यात आला आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील २२ पारंपरिक तलावांमध्ये विसर्जनाची सुविधा आहे.
यामधील १४ तलावांमध्ये गॅबीयन वॉल टाकून त्याचे दोन भाग तयार केले असून एका भागातच विसर्जन केले जाते. यामुळे संपूर्ण तलावामधील पाणी प्रदुषित होत नाही. प्रत्येक विभागात मुख्य तलावाच्या शेजारी, उद्यान, मैदान व महत्वाच्या ठिकाणी कृत्रीम तलावाची सोय उपलब्ध करून दिली आहे. गतवर्षीही १४, ०९० श्रीमूर्तींचे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले होते. यावर्षीही जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम तलावांचा उपयोग करावा असे आवाहन राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
नवी मुंबईत विसर्जनासाठी १३९ कृत्रिम तलावांची निर्मिती
