नवी दिल्ली – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी आज दुपारी एक ट्विट केले. यात त्यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवे, पंतप्रधानांनी नाही, असे म्हटले आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला. ते म्हणाले की, ‘नवीन संसद भवन उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले आहेत. मोदींचे कोणतही चांगले काम राहुल गांधी यांना पाहवत नाही.’ दरम्यान, याआधी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होणार असल्याची माहिती दिली होती.
जानेवारी २०२१ मध्ये संसद भवनाच्या इमारतीचे काम सुरू झाले. टाटा प्रोजेक्ट्स या इमारतीची निर्मिती करत आहे. या प्रकल्पासाठी ८६२ कोटींची रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र, या इमारतीचा एकूण खर्च सुमारे १२०० कोटी इतका झाला आहे. त्याखेरीज या इमारतीच्या सुशोभिकरणासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून आणखी खर्च करण्यात येणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांखेरीज या भवनात एक वाचनालय, बैठकांच्या खोल्या, कार्यालय, एक हॉल असे भाग असणार आहेत.