नागपूर- नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील सिमेंट विटा बनवण्याच्या श्रीजी ब्लॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की आसपासच्या परिसराला हादरे बसले. या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या नंदकिशोर करंडे या कामगाराचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोमवारी रात्री कंपनीत विटा बनवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही कामगार रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. दरम्यान, आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कंपनीत काम सुरु असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की कंपनीचे छप्पर उडाले. स्फोटानंतर कंपनीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य केले. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या दुर्घटनेचा तपास करत आहेत.