नागपूर
श्रावण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील नागपुरात सुमारे १२७ वर्षांपासून मारबत उत्सव साजरा केला जातो. यावेळी काळी, पिवळी मारबत आणि बडग्याच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची मिरवणूक काढून दहन केले जाते. यंदा मारबतचा उत्साहात पावसाने हजेरी लावली होती. या मिरवणूकीत लाखों नागपूकरांनी सहभाग घेतला. मारबतीला चालू घडामोडींवर भाष्य करणारे निघणारे बडगे आकर्षणाचे केंद्र असतात. यावर्षी काळी, पिवळी, भुरी आणि लाल अशा चार मारबती निघाल्या होत्या.
जागनाथ बुधवारी येथून तऱ्हाने तेली समाजाची पिवळी, तर बारदाना मार्केटमधून काळी मारबत निघाली. या दोन्ही मारबतींचे एकत्रीकरण इतवारीतील नेहरू चौकात झाले. काळ्या-पिवळ्या मारबतींसह सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या बडग्यांनी लक्ष वेधून घेतले. उत्सवांतर्गत मिरवणूक संपल्यानंतर सायंकाळी पिवळ्या मारबतीचे दहन नाईक तलाव, तर काळ्या मारबतीचे दहन लकडगंज येथील हरिहर मंदिरजवळ करण्यात आले.मस्कासाथ येथील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे द्रमुकचे नेते तथा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या बडग्याने लक्ष वेधून घेतले.