नागपूर : नागपूरातील नाईक तलावातील भल्या मोठ्या कासवाची सुटका करण्यात आली आहे. हे कासव तब्बल १२० किलो वजनाचे आहे. या तलावात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे कासव असल्याचे नागरिकांनी आधीच सांगितले होते. महिनाभरापासून त्या कासवाला बाहेर काढण्यात प्रयत्न सुरू होते. पण तलावात पाणी आणि गाळ त्यामुळे ते शक्य होत नव्हते. आता उन्हाळ्यामुळे तलावातले पाणी आटल्याने कासवाची सुटका करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवित कासवाला बाहेर काढण्यात आले आहे. सॉफ्ट शेल असलेला हा कासव जवळजवळ १२० किलो वजनाचा असण्याची शक्यता आहे. कासवाला बाहेर काढून सेमिनरी हिल्स येथील ट्रांझिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तर सध्या नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या नाईक तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तलावाचे नूतनीकरण झाल्यानंतर पुन्हा त्याला त्याच तलावात सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागपूरच्या नाईक तलावातील महाकाय कासवाची सुटका
