नागपूर –
महामेट्रोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कार्यकाळात विविध कामांवर झालेल्या अफाट खर्चावर कॅगच्या अहवालात आक्षेप घेण्यात आला आहे.
ब्रिजेश दीक्षित यांचा कार्यकाळ मेट्रोवरील अफाट खर्चामुळे गाजला होता. ४१.२२ कोटीच्या कस्तूरचंद पार्क स्थानकावर तब्बल २४.७५ कोटी रुपये खर्च करून वाहनतळ उभारण्यात आला होता. यावरही कॅगने ताशेरे ओढले आहेत.
‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देत सांगितले, ‘कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकाच्या उभारणीवर ४१.२२ कोटी खर्च झाले. पण तेथील वाहनतळासाठी २४.७५ कोटींचा खर्च झाला. नागपूर मेट्रोचा मूळ खर्च ८,६८० कोटी रुपयांचा होता. योजनेनुसार मार्च २०२२ पर्यंत महामेट्रोचे ३८ स्थानकांचे काम करायचे होते. परंतु त्यापैकी २३ स्थानकांचेच काम पूर्ण झाले.’
पवार पुढे म्हणाले, हा प्रकल्प अहवाल मंजूर करताना ३६ स्थानकांनाच परवानगी दिली गेली. परंतु महामेट्रोने स्थानकांची संख्या वाढवण्याचे ठरवले. त्यापैकी एक एअरपोर्ट स्थानक व दुसरे काॅटन मार्केट स्थानक होते. या स्थानकावर ४७.२६ कोटींचा खर्च झाला. परंतु या स्थानकांची गरज नसल्याचे कॅगच्या अहवालात नमुद आहे. महामेट्रोने ७१९ कोटींच्या बचतीचा दावा करत ७५० व्हीडीसी तंत्रज्ञान प्रणाली आणली. परंतु प्रत्यक्षात त्याचा कोणताही फायदा झाला नाही. तीन स्थानकांवर आगमन व प्रस्थान एकाच ठिकाणी असून त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. मेट्रोचे डबे खरेदी केल्यावर ते नागपुरात आणण्यासाठी वेळेत प्रयत्न न झाल्याने महामेट्रोला ४५.८८ कोटी रुपये भाडे हैद्राबादच्या एलएनटी मेट्रोला द्यावे लागले.
२०१४ ते २०२२ दरम्यान हा गैरप्रकार लपवणाऱ्या लेखापालावर कारवाई करावी, अशीही मागणी पवार यांनी केली आहे.