मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या काल झालेल्या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखालील रंगकर्मी नाटक समूह पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला. दामलेंच्या पॅनलने प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनेल ‘चा सपशेल पराभव केला. एकूण दहा जागांपैकी ८ जागा प्रशांत दामले यांनी पटकावल्या, तर प्रसाद कांबळी यांना २ जागांवर समाधान मानावे लागले.
काल रविवारी संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान सुरू होते. त्यानंतर तातडीने मतमोजणीला सुरुवात झाली.रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाल्यानंतर आज सोमवारी पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल लागला. मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले, तर केवळदोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार जिंकले. यंदा दामले विरुद्ध कांबळी अशी लढाई होती,.त्यात यंदाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या.आरोप-प्रत्यारोप झाले. अखेर दामले यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर आपला झेंडा रोवला. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १३२८ इतके मतदान झाले. त्यापैकी माटुंगा यशवंत नाट्य मंदिर येथे १२४५ आणि गिरगांव येथे ८३ मतदान झाले. तर मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) येथे एकूण ७३० मतदान झाले. विजयी उमेदवारांमध्ये यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे प्रशांत दामले, विजय केंकरे,विजय गोखले, सयाजी शिंदे,सुशांत शेलार, अजित भुरे,सविता मालपेकर,वैजयंती आपटे तर आपलं पॅनलमधील स्वतः प्रसाद कांबळी आणि अभिनेत्री सुकन्या मोने यांचा समावेश आहे.