नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचे नुकसान टाळण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी करावा यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गाेयल यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आता नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येणार आहे. अशी ग्वाही वाणिज्य मंत्र्यांनी दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. परंतु अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे साठवलेल्या कांद्याचे नुकसानच होण्याची शक्यता अधिक होती. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी डॉ. भरती पवार यांनी चर्चा केली असून, नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही वाणिज्य मंत्र्यांनी त्यांना दिली आहे.
राज्यातील किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत २०२२ मध्ये ३५१ कोटी रकमेचा २ लाख ३८ हजार १९६ मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता. यावर्षी देखील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने नाफेड मार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांदा खरेदी करण्यात येणार असल्याचे डाॅ.भारती पवार यांनी सांगितले.