नाफेडचा कांदा खरेदी दरबाजार समितीपेक्षा कमीच

*कांदा उत्पादक नाराज

लासलगाव- नाफेडकडून चालू आठवड्याचा कांदा खरेदी दर २५५५ रुपये प्रतिक्विंटल असा ठरवण्यात आला आहे. परंतु बाजार समित्यांत सद्यस्थितीत ३००० रुपये तर सरासरी २८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी नाफेडचा ५०० ते ६०० रुपयांनी कमी असल्याने नाफेड व एनसीसीएफच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. शेतकरीवर्ग नाफेडच्या दरावर नाराज आहे.

‘नाफेड’ शेतकरी हितासाठी बनलेली असतानाही ‘नाफेड’चे दर कमी का, हा प्रश्न कांदा उत्पादकांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या जाणार्‍या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून ठरवले जात होते. आता नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून ठरवणार असल्याने शेतकर्‍यांचा फायदा होणार, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आजही बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या कांद्याला लिलावात मिळणार्‍या दरापेक्षा नाफेडचे दर कमी आहेत. मागील दोन आठवड्यांसाठी नाफेडच्या कांदा खरेदीचे प्रतिक्विंटलसाठी शेतकर्‍यांना दिला जाणारा दर हा २१०० रुपये होता. मात्र या आठवड्यात दर वाढवूनही बाजार समित्यांत मिळणार्‍या दरामध्ये तफावत आहे.

दरम्यान, केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचे दर बाजार समित्यांत मिळणार्‍या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकर्‍यांकडून नाफेड व एनसीसीएफला कांदा दिला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top