नायजरमध्ये लष्कराचे बंड! सत्तापालटानंतर राष्ट्रध्यक्ष तुरुंगात

नियामी – पश्चिम आफ्रिकेतील देश नायजरमध्ये लष्कराने सत्तापालट केला आहे. नायजरचे राष्ट्रध्यक्ष मोहम्मद बजोम यांना लष्कराने तुरुंगात टाकले असून नायजरच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. नायजर लष्कराने संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला आहे.
लष्कराचे कर्नल अमादौ अब्द्रामा यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत टीव्हीवरुन देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी बजोम यांचे सरकार पाडल्याची घोषणा केली. कर्नल अमादा म्हणाले की, ‘देशातील ढासळती सुरक्षा व्यवस्था आणि वाईट प्रशासनामुळे आम्ही राष्ट्रध्यक्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. नायजरच्या सीमा बंद केल्या असून आता कोणीही देशाबाहेर जाऊ शकत नाही आणि बाहेरून देशात येऊ शकत नाही. संपूर्ण देशात संचारबंदी असून सरकारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.`
या सत्तापालटाची माहिती मिळताच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी नायजरच्या राष्ट्राध्यक्षांना शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, बळाच्या जोरावर घटनात्मक व्यवस्थेवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मोहम्मद बजोम यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करतो. आम्ही नायजरमधील परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. आम्ही नियामी येथील अमेरिकेच्या दूतावासाच्या सतत संपर्कात आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top